शाळा आणि विषय….मराठी….

माझे मराठी चांगले आहे असे बरेच
लोक म्हणतात.आईचे व  बायकोचे पण ह्या
गोष्टीवर ठाम मत आहे की माझे मराठी
उत्तम आहे.
 
सासू आणि सून ह्यात एकमत फार कमी गोष्टीत
होते.विळ्या-भोपळ्याचे सख्य एक वेळ होईल,
पण सासू आणि सून ह्यांचे एकमत होणे म्हणजे
कपिला-षष्ठी योग.
 
पण असा हा आवडता विषय आपण मस्त
आवडीने शिकत असतांना हळूच व्याकरण नावाचा राक्षस प्रवेश करतो.ह्याला ८ हात आहेत..
 
१. नाव
२. सर्व नाव
३. विशेषण
४. क्रियापद
५. क्रिया विशेषण
६. उभयान्वयी अव्यय
७. शब्दयोगी अव्यय
८. केवलप्रयोगी अव्यय
 
(हे ८ ही  आज लिहिता आले कारण विकी-पेडीया मुळे…)
 
 
कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या छोट्या रुपात तो आधी येतो.
ज्या मुलांचे डोके “वैद्यक, वाणिज्य आणि अभियांत्रिकी” ह्यात जास्त चालते त्याला हे शिकून काय फायदा?
रोज बोलतांना किंवा वाचतांना आपण काही ह्या गोष्टी शिकत बसत नाही आणि शोधत तर मुळीच नाही.आता जिथे ह्याच गोष्टी शिकून फायदा नाही तिथे अनावश्यक “कर्तरी प्रयोग,कर्मणे प्रयोग, भावे प्रयोग” शिकून काय फायदा…( मला एव्हढेच आठवत आहेत…भावे प्रयोग म्हणजे काय? असा प्रश्न एकदा परीक्षेत आला होता तेंव्हा….भावे नावाच्या व्यक्तीने मराठी भाषा सुधारायला केलेले प्रयोग असे लिहिले होते…त्यामुळे बाईनी भर वर्गात माझा हा शोध-निबंध वाचून दाखवला..असे मी नंतर खूप शोध लावले..)
आपण कधीही “माझ्याकडून आंबा खाल्ल्या गेला” असे म्हणत नाही…तर मी “आंबा खाल्ला”…किंवा ” मी (चुकून..खरे तर आईचे डोळे चुकवून) आंबा खाल्ला” असेच म्हणतो ना?…
 
ह्याशिव्वाय मग क्रिया-विशेषणे आणि अव्यये…
 
“अरे! बापरे! कसला जोरात पळाला तो “तानाजी” आणि मग पाय घसरून कड्यावरून नदीत पडला.”
 
असे वाक्य जर वाचनात आले तर तुम्ही ह्याचे व्याकरणाच्या तलवारीने ७-८ तुकडे करणार की….
 
हा तानाजी कोण?…तो कुठे चालला होता?…तो कुठून आला होता?…तो का पळाला?…आणि मग तो नदीत पडल्यावर पुढे काय झाले?..
असे प्रश्न मनात येणार?
 
शुद्धलेखन आवश्यक आहेच पण ते शिकवायची पद्धत पण तितकीच गरजेची आहे….
 
“पाणि” आणि “पाणी” ह्यातील फरक काय हे उदाहरण देवून स्पष्ट केले तर शुद्धलेखन  नक्कीच सुधारेल…..

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

यावर आपले मत नोंदवा