Category Archives: Uncategorized

एक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”

प्रवेश : पहिला

ठिकाण : सर्व सामान्य घर

वार शनिवार, वेळ रात्रीचे ८, सव्वा ८

नायक आपला स्वस्थ पणे संगणकावर काम करत आहे.म्हणजे काम करायचे नाटक वठवत आहे.ऑफीसमध्ये पण असेच करत असल्याने त्याचे हे नाटक उत्तमपणे वठत पण आहे.(नाटकात अजून एक नाटक.लेखक इंग्रजी सिनेमे जास्त बघतो, त्याचा हा परीणाम आहे.)…एव्हढ्यात मोबाइलची घंटी वाजली..

(हो हो घंटीच… नायकाच्या मोबाईलची रिंग टोन आहे ती…..”नायकाचे अज्जुन पण भूत काळाची घट्ट नाते आहे”असे नाटककार इथे सांगत आहे,…. हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आले असेलच.)

नायक : (आधी नांव बघून) अबे साले तु है किधर. आज याद आली का रे गड्या.

आता थोडा पॉझ घेत घेत..

हो ऐकत आहे….ती ना स्वैपाकघरांत आहे…बोल बिंधास्त..आज काही त्रास नाही…अरे एकदम शांतच करून टाकलय तिला…आता निदान २ दिवस तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिचा… हं ऐकतोय….. कधी?…आत्ता… मग..अर्ध्या तासाने.. चालेल …कुठे… तिथे नको… अरे तिथे फार गोंधळ असतो.. गप्पा नाही मारता येणार.. मग तिथे ठीक आहे.. पण त्यांची मछ्छी करी बोंबललेली असते… अरे अजून तब्येत ठीक आहे माझी.. आणि त्या कार्यक्रमानंतर तर जेवण मस्त हवेच आणि मी काही मुद्दाम जेवायला म्हणून दुसरीकडे जाणार नाही.जेवण पण शक्यतो तिथेच घेतलेले उत्तम…. मग ठीक आहे मीच सांगतो.. हे अमुक तमूक हॉटेल मस्त आहे.. शांत जागा आणि खायला-प्यायला एकदम योग्य जागा…. हो मी निघतो लगेच.. अरे डोंट वरी… हम है तो क्या गम है…

नायक मोबाईल बंद करतो आणि बायकोला हाक मारतो. बायको पदराला हात पुसत-पुसत येते.

बायको : बोला.. आता कुठे जाणार.

नायक : अगं तुला तो जोश्या नाहित आहे ना? अगं त्याला ना कसला तरी प्रॉब्लेम आहे.आता फोन वर काही सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत आणि कुठे तरी निवांत बोलायला पाहिजे म्हणून जरा जावून येतो.

बायको : कोण जोशी?तुम्हाला जोशी नावाचे १७६० मित्र आणि एकाला पण तुम्ही घरांत आणले नाहीत.बरे ते जावू दे, आत्ता जाताय,मग बाहेरच जेवणार असाल?

नायक : मी तरी काय करू.जोश्यांची आणि माझी पत्रिका जुळते,हा काही माझा दोष नाही.हा जोश्या माझ्याबरोबर कॉलेजला होता.बर्‍याच गप्पा टप्पा होतील त्यामुळे आता रात्री किती वाजता परत येईन काही सांगता येणार नाही,शिवाय मी आल्यानंतर परत मग वाढायचे आणि आवरा आवरी करायचे तुला पण कष्ट नकोत.

बायको : तुम्हाला माझी किती काळजी वाटते , हे मला चांगले ठावूक आहे.उद्या रविवार आहे आणि मला एके ठि़काणी जायचे आहे,घर तुम्हालाच सांभाळायचे आहे.त्या प्रमाणे मजा करा आणि या.लॅच ची चावी घेवून जा.मी अजिबात दार उघडायला येणार नाही.आधीच बजावून ठेवते.तुमच्या विसरभोळेपणाची शिक्षा मला नको.
======================================================================

नायक निघतो…

प्रवेश : दुसरा

ठि़काण : हॉटेल मधले एखादे टेबल.

नायक आणि नायकाचे मित्र येतात आणि बसतात.

नायक : कसा आहेस? आज एकदम कसे काय ठरवलेस?

जोश्या : सांगतो..जरा दम धर..आधी ऑर्डर तर देवू.

जोश्या वेटरला बोलावतो.वेटरला बोलवायचा आणि ऑर्डर द्यायचा यजमानांचा अधिकार असल्याने नायक गप्प…

वेटर : बोलीये सर

जोश्या : मराठी येते का?

वेटर : साहेब मी मराठीच आहे. बोला काय आणू? ह्या साहेबांचे मला माहित आहे.तुमचे सांगा.

जोश्या ऑर्डर देतो.

नायक : हं..बोल आता घडाघडा.

जोश्या : अरे बाबा काय करू? सध्या आमची ही जाम त्रासली आहे.आता नक्की कशामुळे ते माहीत नाही.पण आता त्रासलीच आहे तर तिला शांत तर करायलाच पाहिजे ना?

म्हणून मग तिला घेवून हॉटेलात गेलो,पुण्याला हिच्या सासरी गेलो,त्या लक्ष्मी बाजारांत १६/१७ तांस हिच्याबरोबर फिरून चांगल्या ४ साड्या घेवून दिल्या शिवाय माहेरून २/३ साड्या मिळाल्या त्या वेगळ्याच.आता माझी बायको रोज पंजाबी ड्रेस घालते तरी पण तिला साड्या ह्या हव्यातच.परवा सहज हिचे कपाट उघडे होते म्हणून बघीतले तर हज्जारो साड्या.बहूदा रिटायर झाली की ही साड्यांचे दुकान टाकणार बघ.एव्हढ्या साड्यांचे ह्या बायका काय करतात कुणास ठावूक?मागच्या आठवड्यांत कुठेतरी जायचे होते.. कशाला बरे .. हां ते मंगळागौरीला.. म्हणून एकाच्या जागी २ नववारी साड्या घेवून आली….काही कारणामुळे ते जायचे रहीत झाले.त्या नववारी साड्या अजून तशाच पडून आहेत. बरे इतक्या साड्या आहेत पण ऐनवेळी एक पण नेसत नाही.कधी मॅचिंग परकर नसतो तर कधी मॅचिंग ब्लावूजच नसतो आणि हे दोन्ही मिळाले तर नेमकी साडीला इस्त्री नसते.आमची इस्त्री म्हणजे एक अजब नमूना आहे बघ.साली ऐन वेळी मिळाली आणि ती पण ठीकठाक अवस्थेत हा दिवस कधी आलाच नाही बघ.पहिल्या दिवशी आणली तेंव्हा ठीक होती.पण दुसर्‍या दिवसापासून जी बिघडली ती बिघडलीच.

नायक : (पहिले वाक्य ऐकल्यानंतर,नायकाने मोबाईल मध्ये तोंड घातलेले..आता एकदम जोश्या बोलायचा थांबल्यामुळे, नायकाच्या लक्षांत फक्त शेवटचीच २/३ वाक्ये राहिली होती.त्यामुळे त्याने फक्त त्या वाक्यांचाच विचार करून बोलला) हो ना माझ्या घरी पण सेम प्रॉब्लेम आहे.शेवटी मी माझे कपडे भय्या कडूनच इस्त्री करून घेतो.

जोश्या : अरे..मी इस्त्री बद्दल नाही तर बायकोबद्दल बोलत आहे..

नायक : असे होय?मग ठीक आहे. बाकी बायको काय आणि इस्त्री काय? दोन्ही सारख्याच.(इथे नायक जोश्याच्या कानांत काहीतरी सांगतो आणि दोघेही मनमुराद हसतात)

जोश्या : अरे ते इस्त्रीचे नाही रे… तर मी माझी बायको नाराज आहे…हे सांगत होतो.

नायक : अरे मग त्यांत काय एव्हढे.बायकोने नाराज होणे हा तिचा गूण आहे आणि पुरुषाने तिची मनधरणी करणे हा आपला गूण आहे.तू तिची मनधरणी कशी केलीस ते सांग.

जोश्या : अरे परवा मी कुठेतरी संसारदेवाची कहाणी वाचली होती. ते सगळे उपाय करून झाले. अगदी गजरा पण देवून झाला.आता त्यात पण थोडा घोटाळा झाला म्हणा.साली ती पण एक गंमतच झाली.त्या भटाला दुसर्‍या दिवशी सांगीतली तर त्याने जाड्याला आणि म्हश्याला पण सांगीतली. आता रोज मला भेटले तर खुदुखुदु हसतात आणि मला “गजरा जोश्या” म्हणून बोलावतात.हां तर सांगत काय होतो…तुला तर माहीतच आहे माझा स्वभाव.एक तर आपल्याला ह्या असल्या गोष्टी काय शाळेत शिकवत नाहीत आणि बहिणी वगैरे नसल्याने हे नक्की गजरा प्रकरण आहे तरी काय ते ही माहीत नाही.परवा असेच स्टेशन वरून उतरलो तर भट भेटला. हां तोच तो..पुजारी…माझा चेहरा बघून मला म्हणाला ठीक आहे.. चल मी येतो… मग काय ह्या भटाच्या नादी लागून चांगला ५ फुटी आणि ५०० रुपयांचा गजरा घेतला.काहीतरी २ ते अडीच किलो वजन असेल बघ त्या गजर्‍याचे….तू आत्ता कसा नवलाने बघत आहेस ना? तसेच काही तरी मला पण जाणवत होतेच.पण ह्या भटाने सांगीतले की बायकोच्या मापाप्रमाणे बरोबर आहे.. मी घरी गेलो आणि बघीतले तर आमची ही जरा बर्‍या मूड मध्ये होती.

म्हणजे काय झाले त्या दिवशी की नाही, हिच्या मंडळात सुरळीच्या वड्यांची स्पर्धा होती आणि तिच्या सुरळीच्या वड्यांना कुणीही तोंड न लावल्याने त्या तशाच परत आल्या होत्या.आता रात्रीचा स्वैपाक टळला म्हणून आमची बायको फारच खुषीत होती.आजकाल आम्ही हिचे डायट सुरु असल्याने सुरळीच्या वड्या,बाकरवड्या,पाटवड्या किंवा थालीपीठे असेच जेवत असतो.

नायक : अरे व्वा!!! हे तर फारच उत्तम.सुंठीवचून खोकला गेला होता की..मग अशा वेळी तू गप्प बसायला हवे होतेस.तू परत काही तरी घोटाळा केला असशील.

जोश्या : हो ना.. मला पण असेच वाटले.पण म्हणालो अजून एकदा खुंटी हलवून बळकट करू या.म्हणून मग तिच्या हातात अगदी सांग्रसंगीत गजरा दिला.तो सीन मला अजून आठवत आहे.

काय ते तिचे मिटलेले डोळे आणि मी स्वतः तिच्या हातात दिलेला गजरा.पण त्या गजर्‍याचे वजन काही तिच्या कोमल हातांना पेलवेना, म्हणून तिने हळूच उघडलेले डोळे आणि नंतर त्या डोळ्यांतील बदलत-बदलत जाणारे भाव.. प्रथम कुतुहल…नंतर आश्चर्य आणि नंतर रागाने झालेले ते खदिरांसारखे डोळे मी आजन्म विसरणार नाही.

ह्या भटाने मला गजरा म्हणून, हार विकत घ्यायला लावला आणि तो पण लग्नांत घालतात ना तसा.हिने मग तो हार माझ्याच गळ्यांत घातला आणि माझी रवानगी थेट गॅलरीत केली.ह्या भटाने केसाने नाही पण हाराने माझा गळा कापला बघ..

नायक : बरे मग मी काय करू? त्या भटाचे गुण त्याच्या बायकोला सांगू का?

जोश्या : अरे नको रे.ते काम मी आधीच केले आहे.त्या आपल्या पिकनिकचे फोटो टाकले आहेत फेसबूकात.हो तेच ते माधूरीचे आणि भटाचे एकत्र डुंबतांनाचे. ते शेयर केले आहेत भटाच्या बायकोबरोबर.आज केलेत.उद्या बघ आता भटाची गंमत. ते जावू दे… हां तर आपण कुठे होतो.

नायक : ते इस्त्री पाशी.

जोश्या : हां तर मी सांगत होतो की माझी बायको अद्याप नाराज असुन मला तिला ताळ्यावर आणायचे आहे. तुझ्याकडे काही जालीम उपाय असेल तर सांग.

नायक : तु त्या संसारदेवाची कहाणी वाचलीस ना? मग त्यांतलाच एखादा कर ना?

जोश्या : ते सगळे करून झाले.सगळी अर्धवट माहीती दिली आहे.नुसता गजरा विकत घ्या, असे सांगून काही होते का?

गजरा म्हणजे काय? तो कसा दिसतो?कुठल्या फुलांपासून बनतो?साधारण भाव काय?ताजा गजरा कसा ओळखायचा? सुर्यफुलांचा गजरा असतो का? आणि तसेच कमळ आणि झेंडू यांचा पण गजरा असतो का? तो दिला तर समोरच्या पार्टीची काय दशा होईल? तिचे (बायको अथवा प्रेयसी) तापमान किती वाढेल किंवा कमी होईल? सुर्यफूल + कमळ + झेंडू ह्यांचा एकत्र गजरा दिला तर नक्की काय काय होईल हे काहीच लिहिले नाही आहे.

नायक : (मनांत… तिज्यायला हा जोश्या येडपटच आहे आणि त्याची बायको महा येडपट.नुसता पगार,हुद्दा,शिक्षण आणि घर बघून लग्न करतांत आणि मग हे असेच होते.व्यवहारज्ञान नसेल तर ह्या इतर गोष्टी काय कामाच्या) आहे जालीम उपाय आहे. पण मला काही माहिती दे.

प्रश्न पहिला : तुझ्या बायकोच्या मोबाईलची रिंग टोन काय आहे?

जोश्या : काही नक्की लक्षांत नाही.कारण आजकाल तिचा मोबाईल आणि ती दोघेही सायलेंट मोड वर असतात.राग व्यक्त करायची हिची ती एक पध्धत आहे.

नायक : ठीक आहे पण राग येण्याआधी कुठली होती?

जोश्या : काय लक्षांत नाही पण काही तरी “टिकटिक आणि दिल किंवा धडकन” असे काहीसे होते बघ. हां बहुदा

“मेरे दिल की घडी करे टिकटिक टिकटिक”

अशी होती बघ..

नायक : अरे बाबा ही नक्की नसेल रिंगटोन… कारण ही तर माझ्या पणजीच्या मोबाईलची रिंगटोन आहे.हो अज्जून जिवंत आहे माझी पणजी. आम्हा सगळ्यांना शतायुषी असण्याचा शाप आहे..

बहूदा तुझ्या बायकोची रिंगटोन अशी असेल

“टिकटिक वाजते डो़क्यांत..धडधड वाढते ठोक्यांत”

जोश्या : अरे हो हिच आहे….आहे म्हणजे राग येण्यापुर्वी होती…

नायक : बरे सध्या ती कुठले पुस्तक वाचत आहे.

जोश्या : तिला वाचनाचा अजिबात गंध नाही.पेपरचा उपयोग फक्त नाटकाच्या आणि सिनेमाच्या जाहीराती देण्यापुरुताच असतो , असे हेचे ठाम मत आहे.

नायक : मग एकदम साधा आणि सरळ उपाय देतो.

तिला घेवून सिनेमाला किंवा नाटकाला जा…..आणि रिंगटोनमुळे हे काम फारच सोपे करून ठेवले आहे तुझ्या बायकोने..तिला घेवून तू “दुनियादारी” सिनेमाला जा..

जोश्या : अरे पण लेका तूच परवा भटाला सांगीतलेस ना की एकदम बकवास सिनेमा आहे म्हणून आणि आता एकदम पलटी.

नायक : मी तुला काय म्हणालो… तिला घेवून सिनेमाला जा.तू सिनेमा बघ असे कुठे म्हणालो?

जोश्या : हे बघ तू हे असे कोड्यांत नको बोलूस.मला नीट व्यवस्थीत सांग.

नायक : ठीक आहे. मग नीट ऐक.

तुझ्या घरी जसा प्रॉब्लेम आला तसाच माझ्या घरी पण आला.पुर्वी मी हे सगळे संसारदेव वाले उपाय करायचो पण आजकाल इटरनेट आणि मोबाईल आणि टीव्ही मुळ्र गोष्टी बर्‍याच सोप्या झाल्या आहेत.मी तर आज काल ह्या रिंगटोनमुळे बायकोचे मागणे लगेच ओळखतो.तुझ्या बायकोने तरी बरीच सौम्य रिंगटोन वापरली माझ्या बायकोने तर भलतीच रिंगटोन वापरली होती.

“देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही”

२/३ दिवस ही रिंगटोन ऐकली पण मुद्दाम थोडे दुर्लक्ष केले आणि मग वेळ काळ बघून मागच्या शनिवारी मी आणि ती सिनेमाला गेलो.

आता तुला तर माहीतच आहे की मी फक्त इंग्रजी सिनेमे बघतो तरी पण गेलो.त्या आधी मस्त पैकी सांग्रसंगीत भोजन केले आणि दुपारच्या शो ला गेलो.

जोश्या : कसा काय होता सिनेमा?

नायक : एकदम बकवास.

एक तर मी आधीच ती कादंबरी वाचली होती. त्यामुळे डोक्यांत एक इमेज तयार झाली होती.स्टारकास्ट जर कथेला पुरक असेल तर आणि तरच सिनेमा किंवा नाटक बघायला मजा येते.

उदा. हॅरी पॉटरचे सिनेमे का चालले तर त्यातील स्टारकास्ट मुळे..त्या हॅग्रीडच्या जागी जर मुक्रीला किंवा डंबलडोरच्या जागी ए.के.हंगलला घेतले असते तर चालले असते का?

माझ्या मावशीकडे बरीच नाटकाची पुस्तके आहेत.बर्‍याच वेळा मी आधी ती नाटकाची पुस्तके वाचायचो आणि मग नाटक बघायचो.

“थँक्यु मी.ग्लॅड” मधल्या ग्लॅडच्या भूमिकेला खरा न्याय दिला तो प्रा.मधुकर तोरडमलांनी.

“तरुण तुर्क…” मधले “डी.डी.टी”. आणि “प्रो. हा-हे-ही “ ह्यांच्या भुमिकेत शोभले ते “मोहन जोशी” आणि“प्रा.मधूकर तोरडमलच.”

“सौजन्याची ऐशी तैशी” मध्ये नानाच्या भुमिकेत राजा गोसावी एकदम पर्फेक्ट

अरे ते तर सोडून दे.. मी तर “सिंहासन” आधी वाचले आणि मग सिनेमा बघीतला त्यात इतके सारे स्टार कास्ट असून देखील मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेत शोभले ते अरुण सरनाईकच. खरे तर त्या वेळी निळू फुले ह्यांची जबरा चलती होती पण कथेला अरूण सरनाईकच योग्य होते.

आपण रुषी कपूरच्या जमान्यातले.”बॉबी” “रफु चक्कर” किंवा अगदी गेला बाजार “खेल खेल में” मधला कॉलेज हीरो म्हणून तो खपून गेला (खपून गेला म्हणण्यापेक्षा एकदम योग्य वाटला) पण नसीब मध्ये तो कुठल्याच अँगलने कॉलेज-कुमार वाटला नाही. हे दुनियादारी मधले हीरो पण असेच…..

तो श्रेयसचे काम करणारा असू दे किंवा डी.एस.पी.चे काम करणारा असू दे. त्यातही शिरीन कशी पाहिजे तशी ही नटी काही वाटलीच नाही. त्यात पण मी….ठीक आहे, चलता है… असे म्हणालो असतो पण साईनाथला बघीतले आणि जे डोळे मिटले ते थेट बायकोने सिनेमा संपला असे सांगीतल्यावरच उठलो.आता कथा वगैरे काही विचारु नकोस..बाकी स्टार कास्टचीच इतकी वाट लावल्यावर कथेची नक्कीच वाट लावली असणार.

जोश्या : अरे मग मी जावु का नको? मी तर पुस्तक वाचले आहे आणि तु म्हणतोस ते पटत पण आहे.

नायक : तू मात्र नक्की जा. पण जाण्यापुर्वी ३/४ गोष्टींची खात्री करून घे. बायकोने पुस्तक वाचले आहे का?तिला त्यातील नायक किंवा नायीका आवडतात का? आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे थियेटर ए.सी. आहे का?

जोश्या : आता ह्यात ए.सी.थियेटरचा काय संबंध?

नायक : त्याचे काय आहे सिनेमा आवडला तर हरकत नाही आणि नाही आवडला तर मस्त झोप काढ आणि ये.निदान तूझी बायको तरी खूष होईल…..

शेवटी काय तर “तेरी मेरी यारी तो ……”

Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

सालं म्हातारपण,

मागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती 
देवाघरी गेली..थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक
आनंद जास्त झाला..
खरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये 
पण खरेच वाटले की सुटली बिचारी..९०/९२ वय असेल..
कुणी मोजलंय…
 
८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला, 
पुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती..
रोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल..
पण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला…
 
मागच्या भेटीत इच्छा नसतांना पण
त्यांच्या भेटीला जावे लागले….
माझा स्वभाव माणूस घाणा नाही आहे…पण महिनोन महिने
आजारी असलेल्या माणसांना भेटायला जायला नको वाटते…
त्यांच्या पण काही अडचणी असतात…
पण अशीच एक जनरीत म्हणून जावे लागते….
 
सुदैवाने बायको समजूतदार
असल्याने तिने आधीच भेटीची वेळ ठरवली..
त्यांच्या नातीनेच  फोन उचलला होता त्यामुळे वेळ ठरवतांना काही अडचण 
नाही आली….बऱ्याच वेळा समान वय आणि त्यामुळे येणारे  समान विचार, सुसंवाद साधायला मदत करतात…
 
भेटायला गेलो..घरात इन-मीन चारच माणसे…
आजारी व्यक्ती, तिची सून, नात आणि नातीचा मुलगा…
घर स्वच्छ आणि नीट-नेटके होते तरी, 
घरावर एक उदास छाया पडलेली दिसत होती…
निदान मला तरी तसे जाणवत होते… 
 
खूप दिवसांनी त्या घरी गेल्याने हळूहळू जुन्या आठवणी निघाल्या..आणि मग तिच्या आठवणी मनात रुंजी घालायला लागल्या…
 
सदैव हसतमुख आणि टवटवीत असलेला चेहरा आता दुर्मुख आणि  मलूल दिसत होता…घरातील सतत असलेला गोतावळा आणि गडबड गोंधळ पण कुठेच दिसत न्हवता….ज्या हाताने एके-काळी सर्व आळीला पुरण-पोळी खायला घातली तोच हात आता स्वत:ची औषधाची गोळी पण घेवू शकत न्हवता आणि सलाईन व इंजेक्शनच्या सुयांनी खिळखिळा झाला होता…वेळ-प्रसंगी स्वत:च्या आईला  पाठीवर घेवून दोन-दोन जिने चढणारे पाय आता चाकाच्या खुर्चीत पण बसायला नकार देत होते…जे कान परसदारी पडलेले पान पण ऐकू शकत होते ते आता कानाचे यंत्र लावून पण ऐकायला मदत करत न्हवता….सगळी गात्रे शिथिल तर झाली होतीच पण आता शरीर पण परावलंबी झाले होते…
सुदैवाने घरचे ठीक होते म्हणून आर्थिक अडचण जास्त न्हवती पण सामाजिक अडचण मात्र खूप होती….गेली कित्तेक वर्षे सगळे कुटुंब ना कुठे एकत्र सहलीला गेले ना ही सिनेमाला…घरातील एक आजारी व्यक्ती संपूर्ण घर असे दुळे-पांगळे केलेले त्या व्यक्तीला पण आवडले नसते…पण म्हातारपण आणि आजारपण ह्यामूळे ती व्यक्ती हतबल झाली होती…
 
ती मंडळी पण आधीचा थोडा संकोच दूर करून मनापासून गप्पा मारू लागली…बोलतांना चुकून पण आजारी व्यक्तीचा उल्लेख मनात असूनही ओठावर आणला नाही….घरी आलो आणि थोड्या वेळाने त्यांच्या नातीचा फोन आला…आमची भेट तिला आणि तिच्या आईला आवडली असे म्हणाली…इतर मंडळी फक्त आजारपण आणि निरनिराळे औषधोपचार ह्या विषइच बोलत असल्याने आणि आम्ही कटाक्षाने तेच टाळल्याने तर आनंद झालाच, शिवाय त्यांच्या सेवा-सुश्रुतेच्या काळात आम्ही तिथे नसल्याने त्यांना जास्त समाधान वाटले…
 
         रात्री जेवण झाले आणि शतपावली  करतांना मनात विचार आला, की अरे हे तर आपल्या बाबत पण नक्कीच होऊ शकते…आज आपल्याकडे आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ आहे पण उद्या हे दोन्ही नसेल तर काय?..बरे तसेही ७५ वय ओलांडले की आपण कुठेच शारीरिक मदत करू शकत नाही…बरं आपण तर काही साधू-संत नाही….की जेणेकरून  देव आपल्याला स्वत: घ्यायला येईल…सालं हे असले परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आणि इतरांना वेठीस धरण्यापेक्षा, मग आपण स्वत:, आपण होवून देवाघरी हसत-मुखाने आणि सर्वांचा मजेत निरोप घेवून गेलो तर…..
 
चला एक ध्येय मिळाले…..
 
आता निवृत्ती नंतर इच्छा मरणाचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा ह्यासाठी प्रयत्न करायच्या मागे लागावे

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

अष्टभूजा…की….अष्टावधानी की….

 

एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची
ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला
आणि तिकीटाची वाट बघत बसलो…
घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..
 
दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी
द्यायला सुरुवात केली…ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय 
इतरही यादी खूप होती…मी पण खूपच चिडलो आणि
बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले…
 
एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि
मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट 
पण मिळाले… चला आता पूर्ण १ महिना फक्त  आराम… 
विमान दुबईला एक थांबा घेवून मग
मुंबईला जाणार असल्याने अजून थोडी खरेदी झाली…
 
आई-वडिलांसाठी बिस्किटे आणि मुलांसाठी
स्पेशल स्विस चॉकलेट्स…तेव्हढ्यात राणीची
(म्हणजे आमच्या कुत्रीची) आठवण आली
आणि मग तिच्या खास  बाकरवड्यांची
(ह्या दुबईत जरा स्वस्त मिळतात..)
पण खरेदी करून झाली…
 
पहाटे ३ वा. विमान मुंबईत उतरले आणि
काका मामांना नमस्कार करून मी बाहेर आलो..
गुरुवार असून पण बायको आणि ड्रायव्हर सामान
घ्यायला आले होते…
 
सामान ठेवले आणि बायको बरोबर मागे बसलो…तिने लगेच एका डिश मध्ये पोहे दिले आणि मग खावून झाल्यावर छान आले घातलेला चहा दिला…पहाटे ६ वा. डोंबिवलीला  पोहोचलो..सासूबाई नुकत्याच उठून बसल्या होत्या…त्यांचा अजून चहा व्हायचाच होता…त्यामुळे बायको लगेच स्वयंपाक घरात पळाली…मी लगेच मुलांकडे धावलो…थोड्या वेळाने मुले तयार होवून शाळेत गेली…आज त्यांना मला घेवून शाळेत जायचे होते…माझे पण दहावी पर्यंत शिक्षण ह्याच शाळेत झाल्याने मी पण आवडीने गेलो…
 
घरी आलो तोपर्यंत बायको कचेरीत जायला तयार झाली होती….लग्न झाल्या नंतर बायकोने कधी नोकरी नोकरी केली न्हवती…पण सध्या करत आहे….गरज आहे म्हणाली…….नवीन नोकरी असल्याने तिला कामावर जाणे भागच होते, असे तिने सांगितले….मी एक वर्ष दूर राहून घरी येतो काय आणि लगेच बायको कामावर जायला निघते काय…राग तर खूप आला पण गिळून टाकला….मनात शंभर आकडे मोजले आणि आन्हिके उरकायला सुरुवात केली…न्हाणीघरात जावून ३/४ मिनिटे होत नाहीत तोच राणीने (आमचे कन्यारत्न) भुंकून-भुंकून घर डोक्यावर घेतले…..सासूबाई काही घेवून जावू शकत न्हवत्या त्यामुळे,  कशी-बशी आंघोळ उरकली आणि तिला खाली घेवून गेलो…
 
घरी गेलो तो पर्यंत पेपर आला होता…सासू बाई आता गाढ झोपेत होत्या…ऐकायला तर येत न्हवतेच पण आता डोळेही साथ देत न्हवते…चहा गरम केला आणि मस्त पैकी पेपर वाचायला घेतला…(इ-पेपर पेक्षा असा पेपर मला  वाचायला मला खूप आवडतो)….पहिले पान वाचून दुसऱ्या पानाकडे वळणार तोच सासूबाई उठून बसल्या आणि चहाची फर्माईश केली…पेपर टीपॉयवर ठेवला आणि लगेच चहा करायला धावलो……. मस्त पैकी त्यांना आवडतो म्हणून आले, गवती चहा आणि थोडी दालचिनी पावडर घालून चहा केला…मी आणलेली बिस्किटे पण दिली…अद्याप ब्याग उघडलेली नसल्याने बिस्किटे लगेच मिळाली…बिस्कीटांचा वास आला आणि राणीने पण हट्ट धरला…तिला तिचा खावू दिला….त्यांचा चहा होईपर्यंत वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले…चहा पिवून झाला आणि सासूबाई परत झोपायला मोकळ्या झाल्या…
 
आता घरात काय काय आहे म्हणून बघितले तर बायको पोळ्या करून गेली होती….शीत कपाटात भेंडी होती…चला आता मस्त भेंडीची भाजी करुया म्हणून भेंडी चिरली तोच दूरध्वनी वाजला…आमच्या मातोश्रींचाच होता  त्यामुळे १०-१२ मिनिटे जुजबी बोलणे झाले…संध्याकाळी मला घरी यायचे आमंत्रण दिले….आणि मग तिथून जी काही कामे सुरु झाली म्हणता काय विचारू नका…
 
राणीचा भात लावून झाला…कपडे धुवून झाले…कुकर लावून झाला…मध्येच मित्रांचे फोन झाले…कामवालीने दांडी मारल्याने केर-वारे झाले..कपडे वाळत टाकून झाले…दर २/४ तासांनी राणीला बाहेर घेवून जायला लागले आणि ती पण एव्हडी गुणाची की विधी करून झाले की लगेच घरात येत होती…
 
१ वा. मुले आली मग मस्त गप्पा-टप्पा करत जेवण झाले….मुलाचा गृह-पाठ झाला आणि मग तो माझ्या बरोबर अभ्यास करत बसला…एकीकडे माझी भांडी घासणे, कपडे आवरणे इ. वरकड कामे सुरूच होती….एक तर रात्र भर झोप नाही, प्रवासाने अंग आंबून गेलेले आणि वर ही कामे काही संपत नाहीत…..
 
दु. ४ वा.  बायको आली आणि मग तयार होवून आम्ही आमच्या घरी गेलो…मुलाने सासूबाईना सोबत म्हणून घरीच राहायचे ठरवले…..माझी स्वारी जरा रागातच होती आणि हे बायकोला समजत असूनपण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मला जाणवतही होते, त्यामुळे रागात अजून भर पडत होती….
 
घरी गेलो आणि आई व वडिलांचे सामान त्यांना दिले…मग तिथेच जेवायचा आईने प्रस्ताव ठेवला…मी होकार दिला…तोपर्यंत बायको जरा बाजारहाट करून आली…मग तिथेच जेवून आम्ही घरी  यायला निघालो…येतांना बायको जवळ नवीन नोकरीचा विषय काढला तर तिने ती सोडली असे सांगितले….आता उद्या पासून घरकाम मला करायला लागणार नाही म्हणून राग थोडा निवळला….
 
अजून ब्यागा उघडलेल्याच न्हवत्या…त्याचे दडपण होतेच…थोड्या रागातच बायकोला मी आज केली त्या सगळ्या कामांची यादी दिली तिने एकच वाक्य टाकले…तुमचे बरोबर आहे, तरी बरे आज दळण टाकणे, भाजी आणणे, बँकेतून पैसे काढणे, L.I.C.चे हप्ते भरणे इ. कामे न्हवती…रात्री मग तिने सांगितले की…..
 
“एका मतीमंद मुलांच्या शाळेत बदली शिक्षक म्हणून ती दर रविवारी काम करत असे…रविवारी मुले घर-काम करायला मदत करतात म्हणून ते शक्य पण होत होते…..पण नेमकी आज अजून एक जण येवू शकणार न्हवती म्हणून मला पण जावे लागले….मी गेले नसते तरी चालले असते पण तुम्ही समजून घ्याल ही खात्री पण होती…पण आता उद्या पासून आपण दोघे राजा-राणी……”
 
मग शांतपणे विचार केला अरे आज फक्त एक दिवस मी घरकाम करून कंटाळून गेलो….ही गेले  वर्ष भर ही अधिक बाहेरची कामे पण हसत मुखाने करत आहे…शिवाय आपण जागा घेत आहोत त्याचे पण काम हिच्या कडेच, शिवाय आला गेला, मुलांचे आजार-पण, त्यांच्या शाळेत जावून येणे….मागच्या वर्षी सासरे वारले तर त्यांचे घर हिच्या आईच्या नावावर करून देण्यासाठी डोंबिवलीतील वकील ते ठाणे कचेरीत चकरा मारणे…बापरे मला तर नुसता विचार करूनच घाम फुटला….शिवाय मुद्दाम मला घ्यायला म्हणून विमान-तळावर पण आली…छे आपले चुकलेच…तिच्या साठी निदान एक सेंटची बाटली तरी आणायला हवी होती…
 
मला माझ्या बायकोचा खरेच खूप अभिमान वाटला…दमली असशील म्हणून तिचे पाय चेपून दिले…आणि चिडलो म्हणून माफी पण मागितली…आपल्याच बायकोची माफी मागायला लाज कसली…आणि पौरुषाचा वृथा अभिमान पण कसला… तिने पण मोठ्या मनाने माफ केले…सकाळी थोडा उशिराच उठलो…राणी आणि बायको बाहेर गेले होते…आता आधी ब्यागा आवरुया म्हणून तिथे गेलो तर पेपर दिसला…पेपर आलाच होता म्हणून चहा आणि पेपर एकत्रच संपवला….
 
सवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी  गेलो तर तिथे  कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

आपले बुवा बरे आहे…

मित्रच आता मित्रांचा खून करतात 
आणि वर खंडणी पण घेतात…
आपले मित्र अजून पण टिकून आहेत..
मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
बायकोने प्रियकराला हाताशी धरले
आणि नवऱ्याला ठार मारले
आपली बायको मात्र अजून पण
रात्री २ पर्यंत जेवायला थांबते..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
मुलाने केला आईचा खून
कारण आला दारू पिवून..
आपली मुले काही असे करत नाहीत
कारण ती अद्याप लहान आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
भाजीचे हे भाव वाढले,
सरकारने पण हात टेकले…
आपण काही भारतात नोकरी करत नाही
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
असते खूपच रांग  तिकिटाला
आणि तशीच A.T.M.ला..
आपल्याला काही फरक पडत नाही
कारण कार शिवाय आपण
भाजी आणायला पण जात नाही..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
ज्वारी पासून दारू बनवणार
आणि मग त्यातून कर मिळणार
शेतकऱ्यांचे भले हो न होवो…
ज्वारीचे भाव मात्र नक्की वाढणार..
आपले मुळात शेतच नाही…
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
कुस्तीगिराला आहे रोजची  भ्रांत
तरीपण आहे सरकार शांत..
भुक्कड खेळाडू आहे क्रिकेटची शान…
त्याला मात्र सगळ्यात मान…
आपण काही कुस्ती बघत नाही…
त्यामुळे आपले बुवा बरे आहे…
 
I.P.L. बघण्यात वेळ कसा
जातो ते कळत नाही
कोण जिंकतो कोण हरतो
त्याने काय फरक पडतो….
 
अर्ध्या कपड्यातील आपलीच मुलगी
I.P.L.मध्ये नाचतांना बघून
तिच्या  पालकांना पण काहीच
विशेष वाटत नाही…
कारण मेंदूतच काही शिरत नाही…
 
माझ्या जाड्या चामडीत, आज-काल
सामाजिक जाणीवेची सुई काही शिरत नाही..
“समाज गेला तेल लावत” असेच रोज
म्हणाल्याशिवाय आपला दिवस सरत नाही….
उद्याचा रोगट समाज बघायला आपण काही असणार नाही…
 
मी काही अमर नाही, त्यामुळे मी काही असणार नाही
 अमरत्वाचा शाप नसल्याने आपले  बुवा खरोखरच बरे आहे…

१ प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

एक विचार….

काल माझ्या वर्ग-मित्रा बरोबर बोलणे झाले….
शाळे नंतर खूप दिवसांनी एक-मेकांशी बोलत असल्याने, 
त्याची सध्याची परीस्थिती काही माहित न्हवती…..
त्याचे शाळेत असतांनाच एका वर्ग मैत्रिणीबरोबर सुत जुळले
आणि नंतर ते विवाह-बेडीत अडकले….
घराचा व्यवसाय असल्याने शिक्षण संपल्या बरोबर
वयाच्या २१व्या वर्षी लग्न पण केले…
आज त्याची मुलगी बी.इ.च्या शेवटच्या वर्षी आहे…
 
त्याच्या अनुभवानुसार लवकर लग्न केल्याने
 त्याचे  नुकसान तर काहीच झाले नाही 
 तर उलट फायदाच झाला…कारण आज
वयाच्या ४६व्या वर्षी तो कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाला….
मी मात्र अजून पुढची ७/८ वर्षे तरी ह्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकणार नाही…..
 
ब्रिटीशांनी काही कायदे जाणून-बुजून केले त्यात हा कायदा पण असावा असे माझे मत आहे…(अर्थात ह्यात पण अपवाद असतीलच पण ते जर १०% पेक्षा जास्त नसल्याने त्यांच्याकडे लक्ष न दिलेले उत्तम….) ……कारण…
 
१. उशीरा लग्न त्यामुळे उशीरा मुले,  त्यामुळे वयाच्या ४०व्या वर्षी जे सामाजिक भान येते ते कौटुंबिक जबाबदारीमुळे  प्रस्थापित शासनाविरोधात (चुकीचे पायंडे पडले असतील तर त्या विरोधात)  लढा द्यायला  नकार देते.
 
२. बचत करायला शेवटची जेम-तेम ४/५ वर्षे मिळतात त्यातच पुढच्या कमीत कमी १५ वर्षांची सोय करायची असते…त्यामुळे  ४०व्या वयापासूनच सामान्य व्यक्ती रस्त्यावर यायला तयार होत नाहीत…
 
तुम्हाला पण अजून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

साबुदाणा खरेदी…

 
मला उपास करता येत नाही..
अहो देवाने इतक्या
उत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही
उपास करायला नाहीत…
 
पण माझ्या बायकोला वाटते की
मी खूप धार्मिक आहे…
बायको बरोबर खरेदी करणे
आणि तो अनुभव काही
वर्षांनी सांगणे हे प्रत्येक
पुरुषाचे कर्तव्य असते…
 
बायको आणि नवरा ह्या
व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या
तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात…
 
गालावरून हळूच फिरणारा चंद्रा
सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी
आपल्या पाठीवर कसा तळपत्या
वज्रा सारखा आदळतो,
हे समजायला (नव्हे अनुभवायला)
लग्नच करावे लागते.
 
लग्नापूर्वी माझी खरेदी ७/८ मिनिटात होत असे..
आपली कुवत आणि गरज बघून खरेदी होत असे..
बरे आमची जमात मुळातच “हिप्पी”..
त्यामुळे प्यांटचे पुढून फाटणे संपून
मागून फाटणे सुरु झाले की
लज्जा भयास्तव पिताश्री वट्ट १०० रु. देत..
त्यात प्यांट आणि बियर बसत असे…
 
लग्नातच कपडे खरेदी भरपूर झाल्याने मला पुढील ५/६ वर्षे तरी काही खरेदी न्हवती..बायकोने पण बरीच खरेदी केल्याने माझा मेहुणा म्हणजे भगवंताचा अवतार असावा असे वाटत होते..(दर वर्षी भरपूर कपडे खरेदी करून ती तो समज खोटा ठरवू देत नाही.)..रोजचे किराणी सामान बायकोच विकत आणत असल्याने मी आपला रोज सुखी माणसाचा सदरा घालून झोपत असे..बायको पण मी किती पाण्यात आहे हे समजून घ्यायला अपेय पान करायला परवानगी देत असे..वेळ जायला  काही तरी साधन हवे म्हणून वाचन पण करत असे..असा आमचा सुखी संसार काही देवाला बघवल्या गेला नाही..
 
एक दिवस माझा रविवार आणि बायकोचा उपवास एकाच दिवशी आले..मी आपला रविवारचा बाजार घेवून आलो तर बायको म्हणाली की तिचा उपवास आहे..मग काय ठीक आहे तू उपवास कर तो पर्यंत मी माझे जेवण बनवून घेतो..तिने साबुदाणा भिजवायला म्हणून डबा उघडला तर साबुदाणांच नाही..मला ही काही जिन्नस हवे होते म्हणून एकत्रच निघालो…मिक्सर खरेदीचा अनुभव होताच त्यामुळे पटकन जावून येवू असे वाटत होते…(लिंक देत आहे…https://full2dhamaal.wordpress.com/2012/02/27/%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a5%80/)..पण मध्ये तब्बल साडे सात महिने गेले आहेत हे माहित न्हवते..
 
घराबाहेर पडलो आणि बायको सुटलीच…वाटेत येणार्‍या प्रत्येक दुकानाचा आणि गेला बाजार टपरीचे मालक हे  नोकर असुन त्यान्चे खरे मालक  म्हण्जे , आपलेच मालक आहेत असा हिचा ठाम समज होता …आता मी सध्या तेलाच्या समुद्रात आणि वाळुच्या वाळवंटात असलो तरीपण खिशात  पैशांचा  दुष्काळ असतोच….साबुदाणे आणायला म्हणुन बाहेर पडलो तर १०-१२ साड्या , त्यांना  म्याचींग  म्हणुन २५-३० ब्लाउज, घरात असावेत म्हणुन ५/६ डझन दारु प्यायचे ग्लासेस्….(मी आधीच सान्गितले आहे , की ही पण लेख वाचते….वाचतांना  मजा वाटते आणि  नंतर  खिशाला सजा होते…ड्राय-डे ला स्टीलच्या ग्लास मधुन द्रव पिवुन तहान भागवणारी जमात आमची, आम्हाला ग्लासचे कसले आले हो कौतुक…)..मग आता ग्लास घेतलेच आहेत तर जरा ५/६ वेगळ्या वेगळ्या बाट्ल्या घेवु या असे म्हणालो तर मला घेवुन ती तिच्या एका नातेवाइका कडे घेवुन गेली…ते बिचारे हा द्रव जगातुन नाहिसा व्हावा म्हणुन स्वतः अगस्ती बनलेले,  हा द्रव तर नाहिसा झाला नाहिच पण त्यांचे  लीव्हर का काही तरी बिघडले..मग मी कसा उधळ्या आहे, स्वार्थी आहे, बायकोला दर तासाला गजरा घेत नाही म्हणुन कंजूष  आहे,अंगावर  येणार्‍या कुत्र्यांना  दगड मारतो म्हणुन मी मारकुटा आहे, असे माझे बरेच गुण-गान त्यांनी  स्टीलच्या ग्लासामधुन त्यांचे  औषध घेत घेत सांगितले …सध्या ते “देशी” वैद्यांचे  औषध घेत  असावेत…बोलतांना  गुंगी  येत होती..(त्यांना….मला नाही..)..शेवटी त्यांना  ह्या त्यांच्या  अमुल्य सल्ल्याची दक्षिणा म्हणुन काही पैसे दिले…मग तिथे थोडा वेळ गेला..(बायकोच्या भाषेत थोडा वेळ म्हणजे पृथ्वीतलावर ३/४ तास , हि  एक वेगळी काल-मापन गणना शाळेत शिकवत नाहीत…लग्न झाले की समजते…) म्हणुन उपासाची मिसळ, दही वडे, बटाटे वडे, कटलेट, मसाले भात..(भगर, बटाटे, रताळे, कच्ची केळी वापरुन केलेला) आणि मग लस्सी पिवून व एक १०-१२ हजार खर्च करून १/२ किलो साबुदाणा आणला…प्रश्न पैशांचा नाही आहे हो..पण हा वाया गेलेला रविवार परत कसा आणावा…
 
त्या दिवसापासून मी उपवासाची तारीख लिहून ठेवतो आणि सगळे पदार्थ वेळीच घरी येतील ह्याची काळजी पण घेतो…हिला वाटते की मी किती धार्मिक आणि हिची किती काळजी घेतो…
 
  अज्ञानात सुख असते असे म्हणतात पण   इतरांच्या अज्ञानात देखील   खूप सुख असते…हेच तर आपण शिकतो.

2 प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

पु.ल.देशपांडे

 
लहानपणी सुट्टीत सायकल शिकणे आणि
वाचनालय लावणे ह्या  दोन गोष्टी
घरोघरी अनिर्वाय होत्या.
 
नुकतेच आम्ही गुलबकावली  आणि ठकसेन ह्यांच्या
राज्यातून  टोम सायर आणि रॉबिन्सन क्रुसो
ह्यांचे वाचन संपवले होते…
आता हा थोडा मोठा झाला असे समजून
आईने “असा मी असामी ” हे पुस्तक वाचायला दिले…
 
तिथून ह्या माणसाने जे “गारुड” घातले
ते अजून सुटलेले नाही…
 
“असा मी ..” नंतर “चाळीत” गेलो..
तिथून “व्यक्ती आणि वल्लींना” घेवून
“खोगीर भरती” केली…
तर “गण-गोतांनी” आमची “खिल्ली” उडवली…
 
सहज म्हणून “पूर्वरंग” घेतले ते “जावे त्यांच्या देशात” असे म्हणून “पश्चिम रंग” करून आलो….
“तुझे आहे तुजपाशी” असे म्हणत असतांनाच “सुंदर मी होणार” कधी ओठावर आले ते समजलेच नाही..
 
“पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे” ह्या लेखकाने उत्तमोत्तम साहित्य देतांना विनोदाची लक्ष्मण-रेषा कधीही ओलांडली नाही.
विनोद करीत असतांना ते थोडे-फार चावट विनोद करत असत पण ते कधीही अश्लील पणाकडे झुकले नाहीत…
आपली पुस्तके एका कुटुंबात वाचली जाणार आहेत आणि ती दिवाणखान्यात ठेवली जाणार आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असावी..
त्यांचे लेख कधी कधी विचार करायला भाग पाडत होते पण कधीही दुखी: करत न्हवते.
 
मध्येच कधीतरी दिवाळीत “वाऱ्यावरची वरात” हे नाटक दाखवले…
आणि हा माणूस कलाकार पण होता हे समजले…
कथाकथन म्हणजे नक्की काय आणि ते कसे करायचे ह्याचे ज्ञान फार कमी लोकांना असते..पु.ल., व.पु, द.मा आणि शं.ना. हे त्यापैकीच..
पण मुकुटमणी म्हणजे पु.ल.
 
“चाळ” असो की “असामी” केवळ एकट्याच्या जीवावर हा कार्यक्रम खेचणे हे खायचे काम नाही…
स्वत: एक उत्तम कवी असल्याने “कविता वाचनाचा” कार्यक्रम  पण ते उत्तम करीत असत…
 
आज कदाचित आमची ही शेवटचे पिढी की जी मराठीची गोडी अनुभवते असे वाटत असतांनाच परवा माझा मुलगा एक पुस्तक वाचत असतांना जोरात हसायला लागला…
सहज म्हणून पुस्तक बघितले तर…”असामी असा मी”….
जो पर्यंत ह्या जगात हे पुस्तक आहे तो पर्यंत मराठीला मरण नाही….
 
अमरत्व काय फक्त देवालाच आहे काय?

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized