नवीन वर्ष आणि रोजनिशी,

 
दर वर्षी शाळा सुरु झाली
की
“रोजनिशी” नावाचे एक पुस्तक मिळत असे…
 
ह्याचा उपयोग केला तर आहे
आणि
नाही केला तर नाही….
 
शाळेतील ही खरी अत्यंत आवश्यक गोष्ट…
पण हिचा उपयोग
मुळात शिक्षकांनाच माहित नाही
तर ते मुलांना काय समजून देणार?
 
शाळेत असतांना हिचा उपयोग
प्रथम कौतुकाने
नंतर आळसाने
नंतर जबरदस्तीने
व सर्वात शेवटी,
कोडगेपणे न लिहिणे ह्यात
होत असे…
 
माझी रोजनिशी जुलै नंतर कधीच लिहिल्या गेली नाही…
 
माणसांचे स्वभाव ओळखायचे असतील तर रोजनिशी हे महत्वाचे साधन…
अर्थात हे सर्व माझे मनाचे खेळ असल्याने,
मी   खाली  जे काही व्यक्त केले आहे तेच खरे असे समजून चालू नये…
 
१. जो दर-रोज रोजनिशी लिहितो तो माणूस पापभिरू, सज्जन व मैत्री करण्यास ठीक…
अशी माणसे बायकोवर प्रेम करतात पण तिच्या मुठीत रहात नाहीत…
अशी माणसे वेळ-काळ आणि पैसा पाहून मदत करणारी..
ह्यांच्याशी ओळख झाली तर तुम्हाला वेळेप्रमाणे मदत जरूर मिळते…
पण तुम्हाला मदत केली अशी ह्यांच्या रोजनिशित नोंद पण होते…
 
२. जो माणूस महिन्यातून कधी कधी रोजनिशी लिहितो
हा माणूस लवकर व्यसनास बळी पडणारा, अपयशाने खचणारा, बायकोच्या मुठीतच स्वत:चे जग शोधणारा
आणि स्वत:चे हित न समजणारा….
अशी माणसे “बैल” असल्याने आपले काम असेल तर ह्यांच्याशी मैत्री करावी…
आणि काम झाले की थोडे पैसे वगैरे देवून ह्यांना मुक्त करावे…
 
३. जो माणूस कधीच स्वत: रोजनिशी विकत घेत नाही किंवा
इतरांनी भेट म्हणून  दिलेली रोजनिशी दुसऱ्याला देवून आपला कार्यभाग  साधणारा असतो.
अशा माणसांपासून जेव्हढे दूर राहता येईल तेव्हडे रहावे…
अगदीच वेळ आली तर थोडा खर्च करून पळून जावे….
कारण ही माणसे वेळ-प्रसंगी तुमचा बळी द्यायला पण कमी करणार नाहीत….
 
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

नूतन वर्षाभिनंदन,

 
माझा ब्लॉग वाचणाऱ्या 
सर्व वाचकांना हे
नवीन वर्ष
सुखाचे,
समृद्धीचे,
समाधानाचे
आणि
आर्थिक व सामाजिक
भरभराटिचे
जावो….

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

खादाडी…भाग १…मिसळ..

माझे ह्या पृथ्वीतलावर का येणे झाले?

तर त्यासाठी जी कारणे आहेत त्यात

खादाडीचा नंबर पण आहे….आणि त्यात पण मिसळीचा नंबर प्रथम…

सुदैवाने डोंबिवलीत मिसळ पुरवठा करणारी ४ उत्तम ठिकाणे आहेत..

 

ही ठिकाणे चढत्या क्रमात आहेत…

१. स्मशान भूमीजवळ, शिव-मंदिराजवळ चौकात एक हॉटेल आहे,

(नाव विसरलो,बहुदा जय-भवानी असे नाव असेल..)..

जर तुम्ही , त्या भागाच्या आसपास असाल आणि

जास्त चालू शकत नसाल तर जा…नाहीतर नंबर २ कडे वळा…

 

२. मून-मूनची मिसळ…

दुकान दाराकडून अपमान (किमान शब्दात कमाल अपमान)

सहन करायची आणि कमीत-कमी जागेत आणि

ठाण्याला मामलतदारची  मिसळ खाण्याएव्हढा वेळ नसेल

तर आणि तरच इकडे जा..

डोंबिवली पश्चिम..एव्हरेस्ट बिल्डींग..तळ मजला..

संध्याकाळी ५ नंतर…

 

३. डोंबिवली एम.इ.डी.सी. कॉलोनी..

लास्ट बस स्टोप..सुभाष डेरीच्या बाजूला..

वडे, सामोसे, मुग भजी व मिसळ ह्या सर्व गोष्टी बऱ्या मिळतात..

एकदा ट्राय करायला हरकत नाही..

आणि माझे आवडते…

 

४. आस्वाद

मानपाडा रोड वर स्टेशन जवळ डोंबिवली पूर्वेला

राणावत मेडिकलच्या समोर

सपन बेकरीच्या बाजूला हे ठिकाण आहे..

त्याची खासियत म्हणजे..

अ) स्वच्छता

ब) बसायला पुरेशी जागा

क) हसत-मुख सेवा

ड) अंगावर न येणारा तिखट-पणा..

आस्वादालाच  संध्याकाळी ७ च्या सुमारास बिर्याणी मिळते….ती पण एकदा ट्राय करायला हरकत नाही…

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

कहानी….एक अनुभव….

 कहानी….एक अनुभव….
 
मला  ज्या गोष्टी मनापासून आवडतात त्यात सिनेमा प्रथम…
 
सध्या रोज एक तरी सिनेमा बघायला मिळतो..
 
काही असेच नकळत मिळतात तर काही वाचल्याने..
 
“कहानी” हा सिनेमा मात्र वाचल्या मुळे समजला…
 
तुम्ही बघितला आहे हा सिनेमा?
नसेल तर जरूर बघा..
 
कुठलेही मोठे कलाकार नाहीत, मोठे सेट्स नाहीत, मारामारी नाही आहे ते फक्त…
दिग्दर्शन आणि कथानक…
 
ह्या सिनेमाची कथा सांगणे किंवा सांगायला लावणे हा त्या सिनेमाचा अपमान आहे…
तुम्ही जर मी आधी सुचवलेले सिनेमे बघितले असतील आणि
जर ते तुम्हाला आवडले असतील तर ही सिनेमा तुम्ही नक्की बघाल…
 

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

शाळा आणि विषय….मराठी….

माझे मराठी चांगले आहे असे बरेच
लोक म्हणतात.आईचे व  बायकोचे पण ह्या
गोष्टीवर ठाम मत आहे की माझे मराठी
उत्तम आहे.
 
सासू आणि सून ह्यात एकमत फार कमी गोष्टीत
होते.विळ्या-भोपळ्याचे सख्य एक वेळ होईल,
पण सासू आणि सून ह्यांचे एकमत होणे म्हणजे
कपिला-षष्ठी योग.
 
पण असा हा आवडता विषय आपण मस्त
आवडीने शिकत असतांना हळूच व्याकरण नावाचा राक्षस प्रवेश करतो.ह्याला ८ हात आहेत..
 
१. नाव
२. सर्व नाव
३. विशेषण
४. क्रियापद
५. क्रिया विशेषण
६. उभयान्वयी अव्यय
७. शब्दयोगी अव्यय
८. केवलप्रयोगी अव्यय
 
(हे ८ ही  आज लिहिता आले कारण विकी-पेडीया मुळे…)
 
 
कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या छोट्या रुपात तो आधी येतो.
ज्या मुलांचे डोके “वैद्यक, वाणिज्य आणि अभियांत्रिकी” ह्यात जास्त चालते त्याला हे शिकून काय फायदा?
रोज बोलतांना किंवा वाचतांना आपण काही ह्या गोष्टी शिकत बसत नाही आणि शोधत तर मुळीच नाही.आता जिथे ह्याच गोष्टी शिकून फायदा नाही तिथे अनावश्यक “कर्तरी प्रयोग,कर्मणे प्रयोग, भावे प्रयोग” शिकून काय फायदा…( मला एव्हढेच आठवत आहेत…भावे प्रयोग म्हणजे काय? असा प्रश्न एकदा परीक्षेत आला होता तेंव्हा….भावे नावाच्या व्यक्तीने मराठी भाषा सुधारायला केलेले प्रयोग असे लिहिले होते…त्यामुळे बाईनी भर वर्गात माझा हा शोध-निबंध वाचून दाखवला..असे मी नंतर खूप शोध लावले..)
आपण कधीही “माझ्याकडून आंबा खाल्ल्या गेला” असे म्हणत नाही…तर मी “आंबा खाल्ला”…किंवा ” मी (चुकून..खरे तर आईचे डोळे चुकवून) आंबा खाल्ला” असेच म्हणतो ना?…
 
ह्याशिव्वाय मग क्रिया-विशेषणे आणि अव्यये…
 
“अरे! बापरे! कसला जोरात पळाला तो “तानाजी” आणि मग पाय घसरून कड्यावरून नदीत पडला.”
 
असे वाक्य जर वाचनात आले तर तुम्ही ह्याचे व्याकरणाच्या तलवारीने ७-८ तुकडे करणार की….
 
हा तानाजी कोण?…तो कुठे चालला होता?…तो कुठून आला होता?…तो का पळाला?…आणि मग तो नदीत पडल्यावर पुढे काय झाले?..
असे प्रश्न मनात येणार?
 
शुद्धलेखन आवश्यक आहेच पण ते शिकवायची पद्धत पण तितकीच गरजेची आहे….
 
“पाणि” आणि “पाणी” ह्यातील फरक काय हे उदाहरण देवून स्पष्ट केले तर शुद्धलेखन  नक्कीच सुधारेल…..

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

राजकीय इच्छा शक्ती

१९९८ला मी महाराष्ट्रात परत आलो

आणि

मी का आलो हा प्रश्न पडला.

हे वाक्य आणि “मी

काय पाप केले होते म्हणून

तुमच्या बरोबर लग्न केले”

हे वाक्य समान आहे.

१९९२ ते १९९८ मी गुजरात मध्ये होतो.

त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना न-कळत सुरु होती.

बाळासाहेब महाराष्ट्र हे मराठी लोकांचे राज्य आहे हे सांगत होते.

त्याचा परिणाम आमच्या कंपनीत पण होत होता.

मला पण थोड्या वेगळ्या भाषेत “गुजराती” शिका असा सल्ला देण्यात आला.

कामगार पण गुजराती शिवाय दुसरी भाषा बोलत न्हवते आणि दक्षिणी लोक पण ही भाषा बोलायचा फक्त प्रयत्नच नाही तर आत्मसात पण करत होते. (वाक्य बोलता येणे हे वेगळे आणि म्हणी व वाक्प्रचार ह्यांचा बोलतांना उपयोग करणे म्हणजे ती भाषा आत्मसात करणे)

सुदैवाने मला महराष्ट्रात नौकरी लागली आणि त्याच सुमारास बाळासाहेबांची सत्ता पण आली..

म्हणालो चला आता श्रींचे राज्य आले..

१ रुपयात झुणका भाकर मिळणार, वीज मुबलक व स्वस्त मिळणार (गुजरात मध्ये त्यावेळी २/३ तास वीज नसायची पण स्वस्त तर महाराष्ट्रापेक्षा होती), आपली भाषा बोलायला मिळणार,

सार्वजनिक वाहतूक स्वस्त नसेल तरी चालेल पण वेळेवर मिळणार, तडीपार गुंडांना शिक्षा होणार आणि कायद्याचे राज्य येणार..

आम्ही मोठ्या खुशीत आलो आणि अपेक्षा भंग म्हणजे नक्की काय ते पण समजले.

ती १ रुपयावाली झुणका भाकर कुठे, कधी व कशी गेली ते समजले नाही.

मराठी शाळा बंद पडून इंग्रजी शाळा वाढल्या.(मला त्रास नाही झाला, कारण १ रुपयावाल्या झुणका भाकर योजनेतून मी योग्य तो धडा घेतला होता.)

वीज म्हणजे नक्की काय हे भर उन्हाळ्यात पंखे चालू नसल्याने समजते.

ह्याच्या बरोब्बर विरुद्ध गोष्ट झाली ती गुजरात मध्ये.

१. मुंबई ते सूरत हा दुपदरी मार्ग चौपदरी झाला.

२. वीज मुबलक व स्वस्त झाली.

३. कारखाने वाढले

४. गाड्या वाढल्या.

५. इतर भाषांच्या शाळा हळू हळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंदी ही महाराष्ट्रातील प्रमुख भाषा आहे ही गोष्ट परत समजली.इथल्या रिक्षावाल्यांना, रेल्वेत तिकीट देणाऱ्यांना कानडी,तेलगु, तामिळ इतकेच काय  पण त्याला ब्राम्ही ही समजेल पण मराठी अजिबात येत नाही.गुजरात मधील ही मंडळी आधी गुजरातीतच बोलणार.

कोकणात रेल्वे सुरु झाली… पण मुंबई ते चिपळूण हे अंतर जवळ-जवळ वलसाड ते मुंबई एव्हडेच असून देखील चिपळूण ते मुंबईला यायला प्रवासाची आखणी करावी  लागते.पण वलसाड ते मुंबई मी कधीही आणि कुठल्याही मार्गाने येत होतो.बाकी लोकल, रिक्षावाले आणि बेस्ट ह्याबद्दल न बोललेच बरे.

खूप वर्षे हा त्रास सहन केला.शिवसेना जावून कोन्ग्रेस आली पण परत पहिले पाढे पंचावन्न.

शेवटी कंटाळून ज्योतिषाला पत्रिका दाखवली.तो म्हणाला साडेसाती सुरु आहे २००६ मध्ये संपेल.२००६ मध्ये माझी साडेसाती संपली की नाही ते माहित नाही पण मी महाराष्ट्र मात्र सोडला.

माझी साडेसाती आणि महाराष्ट्रातील माझे वास्तव्य एकाच वेळी संपले…हा योगा योग असेल कदाचित पण महाराष्ट्रातील मराठी व्यक्तीना अजून पण साडेसाती सुरूच आहे.कदाचित शनी महाराज झोपले असतील किंवा परीक्षा बघत असतील.शेवटी मराठी माणूस सहन करता करता मरेल पण…..त्याला हे भोगायला लावणारे राज्यकर्ते मेल्या नंतर स्वर्गात नक्कीच जाणार नाहीत….ज्यांची काहीही चूक नाही अशा माणसांना जिवंत-पणी नरक यातना देणाऱ्यान्ना देव कशाला स्वर्गात आपल्या बरोबर ठेवून स्वगाचे नरकात रुपांतर करेल?

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

रिक्षावाले…..की?…

रिक्षा, बस,टेम्पो व आग-गाडी ह्यातून प्रवास न केलेला 

माणूस प्राणी  सापडणे म्हणजे डोंबिवलीत

खड्डा नसलेला रस्ता सापडणे एव्हढेच दुर्मिळ…

 

संघटीत लुटमार म्हणजे नक्की काय?

असे जर कुणी विचारले तर रिक्षावाल्यांचा

 प्रथम क्रमांक नक्की…

 

पूर्वी टांगा किंवा सायकल रिक्षा होत्या

पण त्यांची संघटना होती असे कधी वाचनात आले नाही…

एक तर ही दोन्ही वाहने चालवायला शारीरिक कष्ट लागतात

त्यामुळे इतर लोक पण कष्ट करून पैसे कमावतात ह्याची जाणीव असेल असे वाटते.

 

कष्टाळू मनुष्य आपोआपच पापभिरू होत जातो ही सत्य गोष्ट आहे.

एक वचन आहे, “एक माणूस जर ४ लोकांना नावे ठेवत असेल

 तर कदाचित ती ४ माणसे वाईट असू शकतील पण जर तीच ४ माणसे

 जर ह्या एकाच माणसाला नावे ठेवत असतील तर तो माणूसच खराब आहे.”

 

आज सगळ्या शहरांतील माणसे, काश्मीर ते कन्या-कुमारी पर्यंत ह्या रिक्षावाल्यांनाच शिव्या का घालतात?

 

माझ्या आजीची एक शिकवण होती, कधीही कुणाला दुखवू नकोस कारण त्याचे शाप लागतात.

कदाचित आमच्या पुण्याईने तुला त्रास नाही होणार पण तू पुण्य न केल्याने

तुझ्या मुलांना ह्याची फळे भोगावी लागतील.

 

बहुतेक  रिक्षावाल्यांना अशी शिकवण देणारे नातेवाईक भेटत नसतील.समाज चांगला आहे की वाईट हे त्याच्या सरासरीवरून ठरते.८० ते ९०% व्यक्ती चांगल्या असतील तर तो समाज चांगला आहे असे समजल्या जाते आणि इथे तर ह्या रिक्षावाल्यांमध्ये हे प्रमाण ५% पण नाही आहे.

मी बरीच वर्षे ह्या ना निमित्ताने रिक्षामध्ये बसलो आहे आणि मला त्यांचे ९०% भयानक अनुभव आले आहेत.

फार क्वचित एखादा रिक्षावाला चांगला भेटतो.

डोंबिवलीत तर फार त्रास आहे ह्यांचा.

१. इलेकट्रोनिक मीटर न बसवणे..

२. लवकर उतरा अशी घाई करणे.

३. जवळचे भाडे न स्वीकारणे.

४. म्हाताऱ्या, अपंग व स्त्रिया ह्यांचे भाडे  नाकारणे.

५. स्पीड ब्रेकर वरून उड्या मारत जायचा प्रयत्न करणे.

६. मुदाम हूल देणे.

हे तर आहेच शिवाय मराठीत न बोलता हिंदीत बोलणे हा महाराष्ट्राचा शाप पण बोलून दाखवतात.इतर कुठल्याही राज्यात स्वत:हून हिंदी बोलणारा रिक्षावाला मिळाला नाही.

असो मला आता इतरही कामे आहेत.उगाच ह्यांना शिव्या देवून आपण आपला वेळ आणि श्रम कशाला वाया घालवा.

 

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized