अष्टभूजा…की….अष्टावधानी की….

 

एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची
ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला
आणि तिकीटाची वाट बघत बसलो…
घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..
 
दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी
द्यायला सुरुवात केली…ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय 
इतरही यादी खूप होती…मी पण खूपच चिडलो आणि
बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले…
 
एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि
मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट 
पण मिळाले… चला आता पूर्ण १ महिना फक्त  आराम… 
विमान दुबईला एक थांबा घेवून मग
मुंबईला जाणार असल्याने अजून थोडी खरेदी झाली…
 
आई-वडिलांसाठी बिस्किटे आणि मुलांसाठी
स्पेशल स्विस चॉकलेट्स…तेव्हढ्यात राणीची
(म्हणजे आमच्या कुत्रीची) आठवण आली
आणि मग तिच्या खास  बाकरवड्यांची
(ह्या दुबईत जरा स्वस्त मिळतात..)
पण खरेदी करून झाली…
 
पहाटे ३ वा. विमान मुंबईत उतरले आणि
काका मामांना नमस्कार करून मी बाहेर आलो..
गुरुवार असून पण बायको आणि ड्रायव्हर सामान
घ्यायला आले होते…
 
सामान ठेवले आणि बायको बरोबर मागे बसलो…तिने लगेच एका डिश मध्ये पोहे दिले आणि मग खावून झाल्यावर छान आले घातलेला चहा दिला…पहाटे ६ वा. डोंबिवलीला  पोहोचलो..सासूबाई नुकत्याच उठून बसल्या होत्या…त्यांचा अजून चहा व्हायचाच होता…त्यामुळे बायको लगेच स्वयंपाक घरात पळाली…मी लगेच मुलांकडे धावलो…थोड्या वेळाने मुले तयार होवून शाळेत गेली…आज त्यांना मला घेवून शाळेत जायचे होते…माझे पण दहावी पर्यंत शिक्षण ह्याच शाळेत झाल्याने मी पण आवडीने गेलो…
 
घरी आलो तोपर्यंत बायको कचेरीत जायला तयार झाली होती….लग्न झाल्या नंतर बायकोने कधी नोकरी नोकरी केली न्हवती…पण सध्या करत आहे….गरज आहे म्हणाली…….नवीन नोकरी असल्याने तिला कामावर जाणे भागच होते, असे तिने सांगितले….मी एक वर्ष दूर राहून घरी येतो काय आणि लगेच बायको कामावर जायला निघते काय…राग तर खूप आला पण गिळून टाकला….मनात शंभर आकडे मोजले आणि आन्हिके उरकायला सुरुवात केली…न्हाणीघरात जावून ३/४ मिनिटे होत नाहीत तोच राणीने (आमचे कन्यारत्न) भुंकून-भुंकून घर डोक्यावर घेतले…..सासूबाई काही घेवून जावू शकत न्हवत्या त्यामुळे,  कशी-बशी आंघोळ उरकली आणि तिला खाली घेवून गेलो…
 
घरी गेलो तो पर्यंत पेपर आला होता…सासू बाई आता गाढ झोपेत होत्या…ऐकायला तर येत न्हवतेच पण आता डोळेही साथ देत न्हवते…चहा गरम केला आणि मस्त पैकी पेपर वाचायला घेतला…(इ-पेपर पेक्षा असा पेपर मला  वाचायला मला खूप आवडतो)….पहिले पान वाचून दुसऱ्या पानाकडे वळणार तोच सासूबाई उठून बसल्या आणि चहाची फर्माईश केली…पेपर टीपॉयवर ठेवला आणि लगेच चहा करायला धावलो……. मस्त पैकी त्यांना आवडतो म्हणून आले, गवती चहा आणि थोडी दालचिनी पावडर घालून चहा केला…मी आणलेली बिस्किटे पण दिली…अद्याप ब्याग उघडलेली नसल्याने बिस्किटे लगेच मिळाली…बिस्कीटांचा वास आला आणि राणीने पण हट्ट धरला…तिला तिचा खावू दिला….त्यांचा चहा होईपर्यंत वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले…चहा पिवून झाला आणि सासूबाई परत झोपायला मोकळ्या झाल्या…
 
आता घरात काय काय आहे म्हणून बघितले तर बायको पोळ्या करून गेली होती….शीत कपाटात भेंडी होती…चला आता मस्त भेंडीची भाजी करुया म्हणून भेंडी चिरली तोच दूरध्वनी वाजला…आमच्या मातोश्रींचाच होता  त्यामुळे १०-१२ मिनिटे जुजबी बोलणे झाले…संध्याकाळी मला घरी यायचे आमंत्रण दिले….आणि मग तिथून जी काही कामे सुरु झाली म्हणता काय विचारू नका…
 
राणीचा भात लावून झाला…कपडे धुवून झाले…कुकर लावून झाला…मध्येच मित्रांचे फोन झाले…कामवालीने दांडी मारल्याने केर-वारे झाले..कपडे वाळत टाकून झाले…दर २/४ तासांनी राणीला बाहेर घेवून जायला लागले आणि ती पण एव्हडी गुणाची की विधी करून झाले की लगेच घरात येत होती…
 
१ वा. मुले आली मग मस्त गप्पा-टप्पा करत जेवण झाले….मुलाचा गृह-पाठ झाला आणि मग तो माझ्या बरोबर अभ्यास करत बसला…एकीकडे माझी भांडी घासणे, कपडे आवरणे इ. वरकड कामे सुरूच होती….एक तर रात्र भर झोप नाही, प्रवासाने अंग आंबून गेलेले आणि वर ही कामे काही संपत नाहीत…..
 
दु. ४ वा.  बायको आली आणि मग तयार होवून आम्ही आमच्या घरी गेलो…मुलाने सासूबाईना सोबत म्हणून घरीच राहायचे ठरवले…..माझी स्वारी जरा रागातच होती आणि हे बायकोला समजत असूनपण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मला जाणवतही होते, त्यामुळे रागात अजून भर पडत होती….
 
घरी गेलो आणि आई व वडिलांचे सामान त्यांना दिले…मग तिथेच जेवायचा आईने प्रस्ताव ठेवला…मी होकार दिला…तोपर्यंत बायको जरा बाजारहाट करून आली…मग तिथेच जेवून आम्ही घरी  यायला निघालो…येतांना बायको जवळ नवीन नोकरीचा विषय काढला तर तिने ती सोडली असे सांगितले….आता उद्या पासून घरकाम मला करायला लागणार नाही म्हणून राग थोडा निवळला….
 
अजून ब्यागा उघडलेल्याच न्हवत्या…त्याचे दडपण होतेच…थोड्या रागातच बायकोला मी आज केली त्या सगळ्या कामांची यादी दिली तिने एकच वाक्य टाकले…तुमचे बरोबर आहे, तरी बरे आज दळण टाकणे, भाजी आणणे, बँकेतून पैसे काढणे, L.I.C.चे हप्ते भरणे इ. कामे न्हवती…रात्री मग तिने सांगितले की…..
 
“एका मतीमंद मुलांच्या शाळेत बदली शिक्षक म्हणून ती दर रविवारी काम करत असे…रविवारी मुले घर-काम करायला मदत करतात म्हणून ते शक्य पण होत होते…..पण नेमकी आज अजून एक जण येवू शकणार न्हवती म्हणून मला पण जावे लागले….मी गेले नसते तरी चालले असते पण तुम्ही समजून घ्याल ही खात्री पण होती…पण आता उद्या पासून आपण दोघे राजा-राणी……”
 
मग शांतपणे विचार केला अरे आज फक्त एक दिवस मी घरकाम करून कंटाळून गेलो….ही गेले  वर्ष भर ही अधिक बाहेरची कामे पण हसत मुखाने करत आहे…शिवाय आपण जागा घेत आहोत त्याचे पण काम हिच्या कडेच, शिवाय आला गेला, मुलांचे आजार-पण, त्यांच्या शाळेत जावून येणे….मागच्या वर्षी सासरे वारले तर त्यांचे घर हिच्या आईच्या नावावर करून देण्यासाठी डोंबिवलीतील वकील ते ठाणे कचेरीत चकरा मारणे…बापरे मला तर नुसता विचार करूनच घाम फुटला….शिवाय मुद्दाम मला घ्यायला म्हणून विमान-तळावर पण आली…छे आपले चुकलेच…तिच्या साठी निदान एक सेंटची बाटली तरी आणायला हवी होती…
 
मला माझ्या बायकोचा खरेच खूप अभिमान वाटला…दमली असशील म्हणून तिचे पाय चेपून दिले…आणि चिडलो म्हणून माफी पण मागितली…आपल्याच बायकोची माफी मागायला लाज कसली…आणि पौरुषाचा वृथा अभिमान पण कसला… तिने पण मोठ्या मनाने माफ केले…सकाळी थोडा उशिराच उठलो…राणी आणि बायको बाहेर गेले होते…आता आधी ब्यागा आवरुया म्हणून तिथे गेलो तर पेपर दिसला…पेपर आलाच होता म्हणून चहा आणि पेपर एकत्रच संपवला….
 
सवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी  गेलो तर तिथे  कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते….
Advertisements

यावर आपले मत नोंदवा

Filed under Uncategorized

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s