पहिले पान….पाहुणे येती घरा…

पहिले पान….पाहुणे येती घरा…
 
पाहुणे येती घरा, आता विसरा दिवाळी अन दसरा….
कामाची होई गडबड त्यात घरभर पसारा….
 
मोलकरीण ती पसार होई
पाण्याचा ह्या पत्ता नाही……
शिल्लक काही पडेना,
पगार नाही पुरेना….
 
लहानपणी आमच्याकडे पाहुणे मंडळी भरपूर येत असत.
त्याकाळी प्रत्येक घरी अचानक पाहुणे यायचे प्रमाण जास्त होते.
टेलिफोन खात्याने मोबाईल आणि आंतर-जालाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, हल्ली हे मुलांचे आनंदाचे व गृहिणीचे परीक्षा घेण्याचे प्रसंग फार कमी झाले आहेत.
(त्याला अप्रक्ष्यरीत्या माझा आणि माझ्या सारख्या अनंत मुलांचा हातभार आहे..कारण नंतर समजेल)
 
मला तर पाहुणे मंडळी फार आवडत असत.त्यात जर त्यांच्याबरोबर एखादे माझ्या वयाच्या
 आसपास असलेले मुल असेल तर फारच आनंद होत असे.सतत भावाला त्रास देवून मला आलेला कंटाळा  व बौधिक मरगळ अशी मुले दूर करीत.
 
प्रत्येक पाहुण्यांचे अनेक आग्रह व समजुती.मुंबईचे पाहुणे मात्र सकाळी येवून संध्याकाळी परत जात.पण दूरचे म्हणजे पुण्याचे पाहुणे आले की मनसोक्त रहात.आमच्या बाबतीत कंजूष (काट-कसरी हे गोंडस स्वरूप) असलेले बाबा पाहुणे आले की मात्र एकदम दिलदार होत असत.हापूसचे आंबे,फणस इ. गोष्टी आणत.त्यावेळी हॉटेलला घेवून जायची पद्धत न्हवती.इन मीन ४ ५ च हॉटेल्स होती. फारच अति झाले  (म्हणजे क्वचित येणारे पाहुणे आले) की  एक दिवस आईस-क्रीम खायला जायचे आणि एक दिवस सिनेमा.तो पण लहान मुलांचा.म्हणजे जय हनुमान,महाभारत इ.पाहुणे मात्र त्यांच्या मुलाना घेवून राणीचा बाग,मत्स्यालय,म्हातारीचा बूट बघायला जात.आजीचे पाय खराब झाल्याने ती काही दिवस बूट वापरत होती,त्यालाच “म्हातारीचा बूट” असे समजून मनाची समजूत घातली.मी अजून “म्हातारीचा बूट” बघितला नाही.
 
एक पाहुणे जेवायला बसले की आधीच दम देत, “पानात काही टाकले तर डोक्यावर थापीन.”   आता काय भिशाद जास्त जेवायची.लग्नानंतर पण मी बरेच दिवस पोट मारूनच जेवत होतो.एक दिवस मुलाने पानात टाकले, पण बायकोने काही ते त्याच्या डोक्यावर थापले नाही.आता ही बाई आपल्याला काही असं पानात टाकल्यावर शिक्षा देणार नाही हे समजले आणि अस्मादिकांचा उपवास सुटला.आपला नवरा अचानक कसा काय भरपूर जेवायला लागला ह्याचे उत्तर तिचे तिनेच शोधून काढले , की , आपला स्वैपाक सुधारला.आता ह्या गैर-समजुतीतून तिला बाहेर काढण्यासाठी आईला बोलावले.उगाच आपण कशाला मांजराच्या गळ्यात घन्टा बांधायला जा.दुसरी मांजर बांधेल.मग दोघींनीही आपापले पाक कौशल्य पणाला लावले आणि मला जरा बाळसेदार केले.बायकांकडे जिद्द हा प्रकार असतो.आईने  हिरकणी आणि झाशीची राणी ह्यांचा आदर्श घेतला तर बायकोने सावित्रीचा.ते दिवस फार मस्त गेले हो….
 
दुसरे पाहुणे आले की मला त्यांचा नोकरच समजत, मला इकडे घेवून चल, माझे पान आणून दे (आता मला पान कितीही आवडत असले तरी माझी खेळण्याची वेळ मी का फुकट घालवू?)एक दिवस म्हणाले की माझ्या पादुका दे…( एक दिवस वर्गात “रामाच्या पादुका” असे न म्हणता “रामाच्या चपला” असे म्हणालो तर बाई त्यांच्या पादुका घेवून मागे लागल्या…त्यामुळे थोर लोकांच्या चपलांना पादुका म्हणतात असा जावई-शोध लागला..बरेच दिवसात असे थोर लोक झाले नाहीत..कारण आज काल पादुका कुठेच दिसत नाहीत..तुम्ही कधी ऐकले आहे काय…असेल तर जरूर सांगा…) आता पादुका काही दिसेनात.मग काय पुस्तकात चित्र बघितले होते.त्यांच्या चपलेचे रुपांतर पादुकांमध्ये केले आणि त्यांच्यासमोर ठेवले.त्याबरोबर त्यांनी माझा उद्धार केला.दोन टेंगुळे, सत्तावीस चिमटे.(कुठे ते विचारुनका..अजून दुखत आहे) आणि किती धम्मक लाडू व चापट पोळ्या दिल्या ते माहित नाही.त्या रात्री एक लाख अश्रू ढळले…माझे पार पानिपत तसे पादत्राणपत झाले.पण त्यातून एक झाले की मला कोणी काम सांगेना.
 
एक पाहुणे जरा मवाळ होते.पण त्यांना मस्करी करायची भारी खोड.मेलेले झुरळ काय हातात खावू म्हणून देतील, हळूच शर्टात बर्फ काय टाकतील आणि सर्वांसमोर फिरकी घेतील.एक दिवस तर अगदी कहर झाला. जेवतांना हळूच त्यांनी त्यांच्या पानातील कारल्याची भाजी माझ्या पानात टाकली.आता डोक्यावर कारली घेवून फिरण्यापेक्षा खावून टाकली.पण म्हणालो आता बास.पान-वाल्याकडून तपकीर आणली आणि ते झोपले असतांना त्यांच्या शर्टावर ओतली.आहाहा! नंतरचा प्रसंग काय वर्णावा…घरभर नुसता धिंगाणा.त्यांना तपकीराची अलर्जी आहे हे मला काय माहित.शिंका तर आल्याच पण सर्व अंगावर पुरळ उठले.बसता पण येईना.
 
असेच एकदा एक पाहुणे आले होते.ते आपले सतत पान खात होते.मला पण द्या म्हणालो तर नाही म्हणाले.आता त्यात तंबाखू असतो हे मला काय माहित?ठीक आहे म्हणालो.एक दिवस त्यांची पाने संपली.मला आज्ञा दिली जा आण.मी पण वाटच बघत होतो.मस्त पानात शेंदूर टाकून दिली पाने.त्यादिवशी माझे पण तोंड मस्त रंगले आणि त्याला माकडाच्या तोंडासारखा आकार पण आला.शेंदूर खावून त्यांचा घसा काही बसला नाही (शुद्ध भेसळ हो…म्हणूनच मी भेसळीच्या विरुद्ध आहे) पण ओरडून ओरडून आईचा घसा बसला.
 
एक बाई आल्या पासून माझी आणि त्यांच्या मुलाची तुलना करायला लागल्या.आता त्यांचा मुलगा असेल ना, साधा सरळ, एक-पाठी (५,१०.२०.३० चे पाढे एकदन मस्त म्हणत होता..१३,१७.१९.२३.२७.२९ म्हणतांना त्याची माता त्याला सुचना करत होती हे मात्र माझी जननी बघून दुर्लक्ष करत होती), ९०% गुण पहिलीत मिळवणारा पण पार्शालीतीमुळे १०वा येणारा.(माझा शाळेत पहिलीत पहिला क्रमांक होता हे मात्र माझी आई विसरली)  शाळेत लाडका, हजरजबाबी (माझ्या मते उद्धट), असा सर्व गुण संपन्न होता.शाळेच्या नाटकात त्याने “अलिबाबा आणि चाळीस चोर” ह्यापैकी ३८व्या चोराची भूमिका केली होती.सर्वात जास्त त्याचीच भूमिका गाजली , कारण ऐनवेळी त्याची सुरवारच घसरली, मग शाळेत तो फोटो कसा सगळ्या वर्गात दाखवला इ. मला असे वाटायला लागले की हा खरेच किती थोर आहे.ह्याला आता हिमालय दाखवायलाच हवा.मग त्याला म्हणालो तुमच्याकडे फ्रीज आहे?तो म्हणाला नाही.थोड्यावेळाने आई शेजारी अद्ययावत बातम्या मिळवायला गेली. त्याची आई आंघोळीला गेल्यावर त्याला मी फ्रीज दाखवला.आणि मग त्यात बसून पण दाखवले..मग त्याला बसवले आणि फ्रीझला कुलूप लावून मी पण शेजारी गेलो.थोड्यावेळाने त्याची आई पण आली.तिचे   परत मी आणि माझा मुलगा प्रवचन चालू झाले. थोड्यावेळाने   फ्रीज मधून आवाज यायला लागला.आईने व त्या बाईने त्या “हुशार आणि हजरजबाबी” मुलाला बाहेर काढले.बाईनी मनसोक्त तोंड-सुख घेतले.आईने न बोलता हात टेकले.शेजारी पण ही खबर गेली.
 
त्यांनी मग ह्यात थोडा मसाला टाकला. १/२ तास तो मुलगा फ्रीज मध्ये होता.
पूर्ण सोसायटीत ही बातमी गेली..त्यांनी १/२ तास चा १ तास केला…
हळूहळू पूर्ण शहरात ही बातमी पोहोचली त्यात एक पत्रकार पण होता…त्याने दुसर्या दिवशी पेपर मध्ये बातमी दिली…
 
यजमान कापतो मान….
 
नुकत्याच हाती आलेल्या बातमी-प्रमाणे, शहरातील पाणी टंचाई, महागाई आणि वीज-टंचाई मुळे  त्रस्त झालेल्या यजमानांनी पाहुणे म्हणून आलेल्या नातेवाइकान्चा फ्रीज मध्ये थिजवून ठार मारण्याचा प्रयत्न केला.आधी प्रयोग म्हणून त्यांच्या लहान मुलाला फ्रीज मध्ये कोंडले पण तो पूर्ण थिजण्या-आधीच शेजार्यांनी हस्तक्षेप केला आणि त्या कुटुंबाची सुटका केली.
 
नंतर पूर्ण आठवडा पेपर मस्त खपले…
पहिला दिवस….पोलीस काय करत आहेत
दुसरा दिवस…असे शेजारी असे व्यवहार….
तिसरा दिवस…पाहुणे म्हणून जावे का न जावे?
चौथा दिवस…यजमान म्हणून कर्तव्ये
पाचवा दिवस…विधानसभेवर यजमान लोकांचा  मोर्चा.
सहावा दिवस…पाहुण्यांचे उपोषण…त्याला अण्णांचा पाठींबा….
सातवा दिवस….अण्णा आणि पाहुणे…..ह्यावर अग्रलेख…
 
आता मात्र सरकारने थोडे डोळे किळकिळे केले.माहिती मागितली.तेंवा असे लक्षात आले कि नकळत अण्णा म्हणजे ते अण्णा नसून दक्षिणात्य अण्णा आहेत. अधिक माहिती घेता असेही समजले की हा सगळा घोळ वेळेत बातमी न गेल्याचा आहे.पाहुणे कधी पण येतात असे आहे.मग सरकारने उपग्रह आकाशात सोडले आणि टेलिफोन व आंतर-जाळेची व्यवस्था केली…बघा मी सांगितले की नाही की ह्या सगळ्या मागे मी आहे म्हणून…..
 
पण ह्यामुळे आमचे नातेवाईक आमच्याकडे येत नाहीत हो! तुम्ही येता का? अजून वीज टंचाई , पाणी टंचाई आणि रस्त्यावरील खड्डे बाकी आहेत…खड्ड्यांचे काम आधी करावे म्हणतो..तुमच्यासाठी एक ६ इंच खोल खड्डा तयार आहे…आपली जनता त्याचे ६ फूट नक्की करेल….आणि मग सगळे रस्ते गुळगुळीत पण होतील….
Advertisements

2 प्रतिक्रिया

Filed under Uncategorized

2 responses to “पहिले पान….पाहुणे येती घरा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s